ब्रम्हपुरी-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत ६५ वर्षीय सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना समोर आली आहे. आज मंगळवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास बेटाळा फाट्याजवळ हा दुर्दैवी अपघात घडला.
पांडुरंग मातेरे असे मृतकाचे नाव आहे . मातेरे हे सकाळी किन्ही येथील मिनी बँकेतून आपले काम आटोपून सायकलने गावी परतत असताना, आरमोरीकडून ब्रम्हपुरीकडे येणाऱ्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना मागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर वाहन चालक आपले वाहन घेऊन पसार झाला.घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाठविला . ब्रम्हपूरी पोलीस अज्ञात वाहन आणि चालकाचा शोध घेत आहे .



