विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तेथील जंगल संपदा राखण्यासाठी व त्याच्या वाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच आग्रही आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचा पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला झिरोधा कंपनी व रेन मॅटर फाऊंडेशन सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्य करणार आहेत.
रिवाईल्डिंग म्हणजे जंगल, गवताळ प्रदेश किंवा जलक्षेत्रात मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून तेथील नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन करणे होय. या संकल्पनेनुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील ८०० एकर क्षेत्राचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासंदर्भातील औपचारिक घोषणा लवकरच होणार आहे.
विदर्भातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी रिवाइल्डिंग सारखे प्रकल्प उपयुक्त आहे. महाराष्ट्र शासन आणि वन विभागासोबतचे हे सहकार्य फलदायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.



