HomeGraminवाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू , नागभीड तालुक्यातील आकापूर शेतशिवारातील घटना

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू , नागभीड तालुक्यातील आकापूर शेतशिवारातील घटना

नागभीड तालुक्यातील आकापूर शेतशिवारात पुन्हा एकदा वाघाने धुमाकूळ घालत एका शेतकऱ्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना तळोधी जवळील आकापूर शेतशिवारात आज शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. वासूदेव लक्ष्मण वेठे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. आठ दिवसांपासून या परिसरात एका पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला होता .

याबाबत तळोधी वनपरिक्षेत्र कार्यालयाला नागरिकांनी माहिती दिली होती, परंतु त्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्याने एका शेतकऱ्याचा बळी गेल्याचा आरोप करीत नागरिकांनी घटनास्थळी वनपरिक्षेत्राधिकारी शहा यांना घेराव घालीत संताप व्यक्त केला आणि जोपर्यंत नागरिकांना सुरक्षिततेची हमी दिली जाणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलण्यास नकार दिला. अखेर तीन चार तासानंतर शहा यांनी नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासोबतच विविध मागण्या अवघा तीन दिवसात पूर्ण करण्याचे लेखी आश्वासनानंतरच मृतदेह उचलण्यात आला आणि घेराव मागे घेण्यात आला.

नागभीड तालुक्यातील आकापूर येथील शेतकरी वासूदेव वेठे ह्याची गावापासून एक दीड किलोमीटर अंतरावर शेती आहे. त्यांनी शेतामध्ये धानाची लागवड केली आहे. धानपिक कापणीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास सदर शेतकरी हा आपल्या शेतामध्ये धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेला होता.

मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. गावकऱ्यांनी तत्काळ शेत शिवारात जाऊन शोधा शोध केली, परंतु त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर सायंकाळी तळोधी पोलीस व तळोधी वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती देण्यात आली.

आज शनिवारी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी पोलिस व नागरिकांनी पुन्हा शोध मोहीम राबविली. शेताच्या एका बाजूला वासूदेव वेठे यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळावरून वाघाच्या हालचालींचे स्पष्ट पुरावे मिळाले असून, ही घटना वाघाच्या हल्ल्यातील असल्याचे वनविभागाने प्राथमिकदृष्ट्या निश्चित केले. तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी शाह त्यांचे कर्मचारी तसेच पोलीस मृतदेहाचा पंचनामा करण्यात येत असताना नागरिकांनी संताप व्यक्त केला आणि वनअधिकाऱ्यांना घेराव घातला आहे.

घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांचा प्रचंड संताप उफाळून आला. जोपर्यंत मृतकाच्या कुटुंबाला तत्काळ मदत, वाघाला पकडण्याची हमी आणि सुरक्षेची ठोस हमी तसेच गावाला कुंपण करण्याची हमी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही प्रेत उचलू देणार नाही. अशी भूमिका घेतली आणि वनपरिक्षेत्राधिकारी शहा मॅडम यांना घेराव घालण्यात आला.

जवळपास तीन तास चाललेल्या चर्चेनंतर अखेर नागरिकांच्या पाच मागण्या मान्य करून त्या तीन दिवसांत पूर्ण करण्याचे लेखी हमीपत्र ग्रामपंचायतीला देण्यात आले. अवघ्या तीन दिवसांत पूर्ण करण्याचे
लेखी हमीपत्र मिळाल्यानंतर नागरिकांचा रोष निवळला वनविभागाच्या वतीने मृतकाच्या कुटुंबीयांना २५ हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

राहुल रामटेके ,नागभीड प्रतिनिधी

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular