भाजप सत्ता काळात अनेक घोटाळे उघडकीस येत आहे.तर दुसरीकडे बेरोजगारी, महागाई व आसमानी संकटांत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी सरकारने दगा केला.सत्तेच्या मदमस्तीत राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारे व राज्याला कर्जबाजारीच्या खाईत लोटणाऱ्या वोट चोरांना होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार राजा काँग्रेस पक्षाच्या तसेच सहकारी घटक पक्षांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून भाजपला धडा शिकविणार असून होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच बाजी मारणार असे प्रतिपादन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, तथा विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ते तालुका काँग्रेस कमिटी मुलच्या वतीने आयोजित आढावा बैठकीत अध्यक्ष म्हणून बोलत होते.
आयोजित आढावा बैठकीस काँग्रेसचे प्रदेश महासचिव संतोषसिंह रावत, माजी आमदार देवराव भांडेकर, भाजपमधून पक्ष प्रवेश करणारे माजी सभापती प्रशांत समर्थ, एकता समर्थ, सभापती राकेश रत्नावर, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, काँग्रेस महासचिव घनश्याम येनुरकर, माजी नगराध्यक्ष विजय चिंड्यालवार, तालुका बँकेचे संचालक विलास मोगरकर, जिल्हा काँग्रेस महिला पदाधिकारी चित्राताई डांगे, माजी जी. प .सदस्य मंगला आत्राम,माजी सभापती वैशाली पुलावर, राजू पाटील मारकवार, महिला अध्यक्ष रुपाली संतोषवार, नलिनी आडपवर, पोभूर्ण अध्यक्ष वासुदेव पाल, बल्लारपूर अध्यक्ष पिंपरे पाटील आदी मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, विखे घराण्याने अस्तित्वाची ओळख करून देणाऱ्या काँग्रेस पक्षावर टीका करताना काँग्रेस पक्षाचे उपकार विसरू नये. असा टोला त्यांनी विखे परिवाराला लगावला. तर जमीन घोटाळ्यावरून शेतकऱ्यांना वारंवार फुकट मागायची सवय लागली असे बोलणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले. महायुती सरकार काळात शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.अशा लुटारू महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी मतदार राजाने कंबर कसली असून हा पक्ष प्रवेश सोहळा म्हणजे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवी भरारी घेण्याची उमेद जागविणारा सोहळा होय.असेही ते यावेळी म्हणाले.
तर आयोजित सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण व विचार तळागळा पर्यंत पोहचवा असे आव्हानात्मक मार्गदर्शन केले.
यानंतर भाजपचे प्रशांत समर्थ यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सोबतच पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा ,डोंगर हळदी व विविध गावातील आम आदमी पक्षाचे व इतर पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
कार्यक्रमाचे संचालन सुनील शेरकी, प्रास्ताविक गुरु गुरनुले तर आभार नलिनी आडपवार यांनी मानले. आयोजित आढावा बैठकीस मूल व पूर्ण तालुक्यातील शेकडोंच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



