जन्म मृत्यू ची नोंद करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर वर्षभरापासून कार्यवाही होत नसल्याने शेकडो प्रस्ताव आदेशाविना मुल उपविभागीय कार्यालयात प्रलंबित आहेत. यासाठी येरझारा घालणाऱ्या नागरिकांना सहकार्य न करता उलट त्यांनाच फाईल शोधण्याच्या कामात गुंतवल्यामुळे अनेक महत्वाच्या फाईल गहाळ होत असल्याचा धक्का दायक प्रकार समोर आला आहे.
वर्षभरापासून जन्म मृत्यूची नोंद करण्यासाठी प्रस्ताव टाकलेले नागरिक आपले प्रकरणे कुठे आहेत हे स्वतःच शोधत आहेत. तर दुसरीकडे आणखी नव्याने प्रस्ताव करण्यासाठी अर्जदारांना कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे.
जन्म- मृत्यू दाखला हा एक महत्वाचा दस्तावेज आहे. शासनाने याचे महत्व ओळखून एक वर्षापेक्षा जास्त विलंब झाल्यास नोंदणी करण्याचे अधिकार उपविभागीय दंडाधिकारी यांना दिला आहे. या अनुषंगाने मागील वर्षभरापासून जन्म – मृत्युचे शेकडो प्रस्ताव मुल उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. परंतु येथे या विभागाचा कुणी वालीच नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.



