चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी बरेच मोर्चा आंदोलने आणि सरकारला निवेदन दिल्यानंतर नऊ सप्टेंबरला आलेल्या सरकारच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा अतिवृष्टी व पुरामुळे बाधित यादीमध्ये दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी थोडा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली होती. यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपिक नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पुरामुळे बाधित तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत पुरविण्याची कार्यवाही महाराष्ट्र शासन द्वारे करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्तांकडून व कृषी विभागाकडून नुकसानीबाबत प्राप्त तपशिलानुसार जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत २५३ तालुक्यामधील शेतीपिक, शेतजमीन नुकसान तसेच वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान विचारात घेऊन शासनाने दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार बाधितांना, आपदग्रस्तांना विशेष मदत पॅकेज व सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



