डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्माचे पुनरुज्जीवन व धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी चंद्रपूरच्या ऐतिहासिक व पवित्र दीक्षाभूमिवर दि. १६ ऑक्टोबर १९५६ रोजी बौध्द धम्माची दीक्षा दिली.त्याप्रित्यर्थ दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ साजरा करण्याची उज्ज्वल परंपरा आहे. यावर्षी सुद्धा १५ व १६ ऑक्टोबरला 69 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आला आहे
.
धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभासाठी श्रद्धेय भिक्खुगण, बौद्ध आणि आंबेडकरी विचारवंत, समीक्षक, साहित्यिक व विविधांगी कार्यक्रमांनी सजलेली पवित्र दीक्षाभूमी आधुनिक संपन्नतेने धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभासाठी पूर्णत: सज्ज झाली आहे.
पुस्तकांचे स्टॉल्स, आरोग्य विभाग, समाजसेवी संघटनांनी स्टॉल लावले आहे.
समारंभाची सर्वोत्तम उपलब्धी विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिंचे जतन केलेला अस्थिकलश दर्शनार्थ उपलब्ध राहील. संपूर्ण दीक्षाभूमी परिसर रंगीबेरंगी रोषणाईने न्हाऊन निघाला आहे. त्याचप्रमाणे पंचशील ध्वज व पंचशील पताकाने दीक्षाभूमी परिसर सजला आहे.
धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभात 15 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता वाहनासह मिरवणूक तसेच
१६ ऑक्टोबरला सकाळी 11वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशासह मिरवणूक काढण्यात येणार आहे. या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांनी केले आहे



