सलग तीन निवडणुकांपासून स्वतःच्या प्रभागातील उमेदवाराला मतदान करण्याचा मूलभूत हक्क नाकारला जात असल्याने वडगाव प्रभागाच्या जगन्नाथ बाबा नगर परिसरातील मतदारांमध्ये तीव्र संताप आहे.
“चंद्रपूरात राहून वरोऱ्याचा आमदार आणि गडचिरोलीचा खासदार निवडायचा का? हा नेमका कोणाचा निवडणूक आयोग आहे—जनतेचा की नेत्यांचा ?” असा संतप्त सवाल त्यांनी आज महानगरपालिकेचे आयुक्त चंदन पाटील यांना केला.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने नुकतीच प्रसिद्ध केलेली प्रारूप मतदार यादी ही साधी त्रुटी नसून महाघोळ असल्याचा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे.यासंदर्भात जनविकास सेनेच्या शिष्टमंडळाने मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांची भेट घेऊन प्रारूप मतदार यादी रद्द करून नव्याने अचूक यादी तयार करण्याची मागणी करणारे लेखी निवेदन दिले. निवडणूक विभागातील दोषी अधिकारी–कर्मचाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.



