शेतात जनावरांसाठी चारा कापत असलेल्या शेतकरी महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना गोंडपीपरी तालुक्यातील गणेशपीपरी गावात घडली, अल्का पेंदोर असे मृतक शेतकरी महिलेचे नाव आहे. गोंडपीपरी तालुक्यात घटना दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतेच तालुक्यातील चेकपिपरी येथे शेतकरी भाऊजी पाल यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच, एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गनेशपिपरी गावात ही घटना घडली. चेकपिपरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर ग्रामस्थ आणि शेतकरी वाघाला जेरबंद करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. परंतु, अद्याप वाघाचा बंदोबस्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. परिणामी परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत आणि शेतात जाण्यास घाबरू लागले आहेत.या घटनेने गोंडपीपरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे
गेल्या आठ दिवसांत दोन व्यक्तींचा बळी घेतल्याने या भागात वाघाचा वावर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या दोन्ही घटनांमुळे तालुक्यातील
ग्रामीण भागात चिंता वअस्वस्थता निर्माण झाली असून, वाघाला जेरबंद करण्याची मागणी तीव्र झाली आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले असून वाघाला पकडण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.



