घुग्घुसपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या धानोरा पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून, त्यातून लोखंडी सलाख्या बाहेर आल्या आहेत. यामुळे पुलावरून जाणाऱ्या वाहनचालकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.हे खड्डे रात्री अपरात्री प्रवासादरम्यान एखाद्याच्या जिवावरही बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सकाळ व सायंकाळच्या सत्रात या पुलावर वाहतुकीस कोंडी होत असल्याने वाहन धारकांना गाडी चालवतांना तारेवरील कसरत करावी लागत आहे. या अशा प्रकारच्या कामा मुळे नेहमीच लहान मोठे अपघात घडत आहेत. परिणामी या अपघातामुळे काहीना अपंगत्व तर काहीना आपले जीवनही गमवावे लागले आहे.
पुलावर पडलेले खड्डे व त्यातून बाहेर आलेल्या लोखंडी सलाख्या चुकविण्याच्या नादात वाहनधारकांना नागमोडी कसरत करत गाडी चालवावी लागते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे तर पुल बांधकामात वापरण्यात आलेल्या लोखंडी पट्टी दीड ते दोन फुटाने उचकटून बाहेर आल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जिव मुठीत धरून गाडी चालवावी लागत आहे.“एखादा जीव गमावल्यानंतर लक्ष द्यायचे का?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या निष्काळजीपणामुळे या पुलाची दुरवस्था अधिकच वाढली आहे. या मार्गावरून हलकी व जड वाहने २४ तास संचार करत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत आहे . विशेषतः भोयगाव–गडचांदूरला जोडणाऱ्या महामार्ग क्रमांक ७ वर औद्योगिक वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने, पुलावरील खड्डे आणि उघड्या सलाख्या वाहनचालकांसाठी अपघाताचे केंद्रबिंदू बनले आहेत.
सध्या या पुलावरून दुचाकी वाहन चालवणे म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासारखे झाले असल्याने परिसरातील ग्रामस्थ व वाहन चालकांमध्ये पूला विषयी प्रचंड नाराजी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन तातडीने पुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ व वाहन धारकांतुन केली जात आहे. संबंधित विभागाने वेळेवर उपाययोजना न केल्यास पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अधिक मोठे अपघात घडू शकतात असे ग्रामस्थांतुन बोलल्या जात असुन त्यास जबाबदार कोण असणार? असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे. अपघातांच्या घटना थांबविण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे आणि त्वरित दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी स्थानिक पातळीवर होत आहे.



