चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात मानव आणि वन्यजीव संघर्षाची भीषणता पुन्हा एकदा समोर आली आहे. मेंडकी येथील भास्कर गजभिये यांचा रविवारी वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भास्कर गजभिये हे धान बांधणीसाठी लागणारी शिंदी आणण्याकरिता मेंडकी जवळील वन विभागाच्या च्या जंगलात गेले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली.
आज, सोमवारी त्यांचा मृतदेह जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. प्राथमिक तपासानुसार, त्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वाघाने क्रुरपणे त्याचा जिव घेतल्याने
परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. भास्कर गजभिये यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. घरातील प्रमुख कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे मेंडकी व जवराबोडो मेंढा परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरात वाघाचे दर्शन होत असून काही जनावरे ठार केल्याच्या घटना ताज्या आहेत.तरीदेखील वनविभागाने बंदोबस्ताची कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. या वर्षातील वाघाच्या हल्ल्यातील ही ३७ वा बळी आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले असून वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



