HomeUncategorizedचंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; एकाच महिन्यात दुसरा विश्वविक्रम!

चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; एकाच महिन्यात दुसरा विश्वविक्रम!

सोमय्या ग्रुपच्या १३०० विद्यार्थ्यांनी साकारले जगातील सर्वात मोठे ‘मानवी शांती चिन्ह’

चंद्रपूर: एकीकडे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असताना आणि इराण-इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असताना, आज चंद्रपुरातून शांततेचा एक बुलंद आवाज घुमला. येथील सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशनच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत ‘जगातील सर्वात मोठे मानवी शांती चिन्ह’ (Human Peace Symbol) साकारून ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपल्या नावाची सुवर्ण अक्षरात नोंद केली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर शहरासाठी एकाच महिन्यात नोंदवला गेलेला हा दुसरा विश्वविक्रम ठरला आहे.

जुन्या विक्रमाला दिला गवसणी

यापूर्वी हा विश्वविक्रम १०७० मुलांच्या नावावर होता. मात्र, आज वडगाव येथील सोमय्या कॅम्पसमध्ये तब्बल १३०० विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मानवी साखळीतून शांततेचे प्रतीक साकारत हा जुना विक्रम मोडीत काढला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत प्रतिनिधींनी या विक्रमाची पडताळणी करून सोमय्या ग्रुपचे संचालक पांडुरंग आंबटकर यांना जागतिक विक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र बहाल केले.

“आज जग संघर्षाच्या छायेत असताना आमच्या विद्यार्थ्यांनी दिलेला हा शांततेचा संदेश केवळ विक्रम नाही, तर जगाला दिलेली एक साद आहे. चंद्रपूरच्या नावावर एकाच महिन्यात दोन जागतिक विक्रम होणे, हा आम्हा सर्वांसाठी ऐतिहासिक क्षण आहे.”

पांडुरंग आंबटकर, संचालक, सोमय्या ग्रुप

विक्रमांची ‘चौकार’

चंद्रपूर जिल्ह्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. या विक्रमासह चंद्रपूरच्या खात्यात आता एकूण चार विश्वविक्रमांची नोंद झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, याच सोमय्या समूहाने गेल्या १ मार्च रोजी २७०० महिलांच्या भव्य ‘लावणी’ नृत्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच हा दुसरा पराक्रम करून सोमय्या समूहाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

ठळक वैशिष्ट्ये:

  • सहभागी विद्यार्थी: १३००

  • स्थळ: सोमय्या कॅम्पस, वडगाव, चंद्रपूर.

  • विक्रमाचे स्वरूप: जगातील सर्वात मोठे मानवी शांतता चिन्ह.

  • विशेष नोंद: चंद्रपूरचा चौथा आणि महिन्यातील दुसरा विश्वविक्रम

spot_img

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular