चंद्रपुरातील नांदगाव पोढे परिसरातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचं संकट कोसळलं .या भागात यंदा सरासरीच्या तब्बल 120 टक्क्यांहून अधिक पाऊस झाल्याने केळी बागा संपूर्णतः उध्वस्त झाल्या. शेत सतत पाण्याखाली असल्याने शेतीत उभं पीक सडून गेलं..!, तर ज्या ठिकाणी काही पीक उरलं, त्यालादेखील बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान प्रचंड झालं आहे.
शेती, मजुरी, मेहनत… सर्व काही पावसाने वाहून गेलं. केळी बागांमध्ये गुंतवलेले लाखो रुपये आता पाण्यात गेल्यासारखे झाले आहेत.त्यातच व्यापारीही या संधीचा फायदा घेत असून, पिकाचे भाव पाडून शेतकऱ्यांकडून उत्पादन विकत घेत आहेत.शेतकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाकडे आणि सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.परंतु अजूनपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांनी वा लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणीसुद्धा केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
आमच्याच विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही मराठवाड्यासारखी मदत आमच्यासाठी जाहीर झालेली नाही.नदीकाठावरील गावं सहा-सहा वेळा पुरात गेली, पण पालकमंत्री डॉ. अशोक उईके आणि प्रशासनानं साधं लक्षही दिलं नाही. शेतकरी आता सरकारकडे न्याय आणि तात्काळ आर्थिक मदतीची मागणी करत आहेत.त्यांच्या मदतीसाठी शासन आणि प्रशासन पुढं येतं का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



