ब्रम्हपुरीहून वडसी गोंदेडा गावाकडे जाणाऱ्या एका चारचाकी गाडीचा आज मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पेंढरी कोकेवाडा येथील दर्ग्याजवळ भीषण अपघात झाला. प्रवासादरम्यान गाडीचे स्टेरिंग अचानक लॉक झाल्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्यावर पलटी झाली.
गाडीतील प्रवासी वडसी येथील रहिवासी असलेले निकोडे हे काजळसर येथून एकटे वडसीकडे जात असताना हा अपघात झाला.
तांत्रिक बिघाडामुळे गाडी पलटी झाली असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, आणि प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही.अपघातानंतर तत्काळ पेंढरी कोकेवाडा गावातील नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घडवले. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त निकोडे यांना धीर दिला आणि पलटी झालेली गाडी सरळ करण्यासाठी तातडीची मदत केली. गावकऱ्यांनी वेळेवर केलेल्या या मोलाच्या सहकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या तत्परतेबद्दल परिसरात ग्रामस्थांची प्रशंसा होत आहे.



