सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी नलेश्वर येथे १९ सप्टेंबर रोजी उघडकीस आलेल्या राजू सिडाम याच्या निर्घृण हत्याकांडाचा सिंदेवाही पोलिसांनी यशस्वीरित्या छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महेंद्र भोजराज पारधी आणि मयूर रामदास वाघमारे या दोन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी रात्री दारू पिण्यासाठी गेलेल्या आरोपींनी मृतक राजू सिडाम यांच्या घरातच ही घटना घडवून आणली. राजू सिडाम यांनी आरोपी महेंद्र पारधी यांना अश्लील शिवीगाळ करून अपमान केला. या शिवीगाळी आणि अपमानामुळे महेंद्रला प्रचंड राग आला. याच रागाच्या भरात महेंद्रने सोबत आणलेल्या धारदार चाकूने राजूच्या गळ्यावर आणि पोटावर सपासप वार केले, ज्यात राजू सिडाम यांचा मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वी वर्गणीच्या वादातूनही राजूने शिवीगाळ केली होती, त्याचाही राग मनात असल्याचे महेंद्रने कबूल केले आहे. घटनेनंतर आरोपींनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला होता. सिंदेवाही पोलिसांनी तातडीने तपास करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे सिंदेवाही पोलीसांनी सांगितले आहे .
सिंदेवाही पोलिसांनी ०४ ऑक्टोबर रोजी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. हि कारवाई पोलीस निरीक्षक कांचन पांडे सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम, यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आली



