नागभीड तालुक्यातील आकापूर येथील शेतकरी वासुदेव वेटे याला शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान शेतावर पट्टेदार वाघाने हल्ला करुन ठार मारल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिवसाढवळया वाघाचे सावर्ला आकापूर मार्गावर दर्शन होत असल्यामुळे आकापूर, गंगासागर हेटी, उश्राळमेंढा, सावर्ला व लखमापूर परीसरातील जनता भयभीत झाली आहे. सध्या हलक्या धानाची कटाई व जड धानासाठी शेवटची पाण्याची आवश्यकता असल्यामुळे या परिसरातील शेतकरी शेतमजुराना शेतावर जाणे बंधनकारक असताना सुध्दा वाघाच्या दहशतीमुळे धोक्याचे ठरले जात आहे.
त्यामुळे जंगलालगत असलेल्या शेतावरील धान कापणीला आले असताना महिला मजूर वर्ग सुध्दा वाघाच्या दहशतीमुळे शेतावर काम करण्यास नकार देत आहे. त्यामुळे आज मंगळवारी नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात यावे याकरीता नागभीड तालुक्यातील तळोधी येथे वनपरिक्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
यावेळी नरभक्षी वाघाला तीन दिवसात जेरबंद करा अन्यथा यापेक्षाही मोठ आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग़्रामस्थानि दिला आहे . यावेळी ग्रामस्थ, काॅग्रेसचे पदाधिकारी तथा शेतकरी संघटनेच्या वतीने वनपरीक्षेत्र अधिकारी लक्ष्मी शहा यांना निवेदन देण्यात आले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश वारजूरकर, माजी सभापती प्रणया गड्डमवार, प्रमोद चौधरी, संरपंच कुणाल गहाणे यांचासह महिला व शेतकरी वर्गाची उपस्थिती होती.



