विषारी नाग साप पकडताना दोन वेळा दंश झाल्याने एका सर्पमित्राचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बल्लारपूर येथे उघडकीस आली असून वेळीच उपचार न मिळाल्याने सरकारी रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच सर्पमित्र महेंद्र भडके याची प्राणज्योत मालवल्याचे बोलले जात आहे.
मृतक सर्पमित्र हा चंद्रपूर जिल्यातील बल्लारपूरच्या विद्यानगर वार्डातील रहिवासी होता. रविवारी सकाळी पेपर मिल परिसरातील न्यू कॉलनी नजीक बीटीटीएल नर्सरी नाग साप निघाल्याची माहिती महेंद्र ला देण्यात आली. सर्पमित्र या नात्याने महेंद्र तात्काळ तिथे पोहोचला त्याने सापाला पकडण्याचा प्रयत्न केला. हे करतांना त्याला दोन वेळा सापाने दंश केला. लागलीच महेंद्र ला बल्लारपूर च्या ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला तिथून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जात असता वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृतक सर्पमित्र महेंद्र शहरात अत्यंत प्रसिद्ध होता आणि त्याने अनेकदा लोकांच्या हाकेला धावून सापांना जीवनदान दिले होते. त्यामुळे त्याचा अकस्मात मृत्यूच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
तिकडे लोकांनी या बाबीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे कि बल्लारपुर सारख्या औद्योगिक शहरात ग्रामीण रुग्णलया मध्ये अद्यावत उपचार व्यवस्था नाहीत. यापूर्वी सुद्धा बल्लारपूर रुग्णालयात अशाच प्रकारची घटना घडली होती.
त्यातही एकाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता. महेंद्र च्या मृत्यूची घटना हि त्याचीच पुनरावृत्ती असल्याचे बोलले जात आहे. सापाच्या दंशावरील इंजेक्शन याठिकाणी उपलब्ध असायला हवे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन योग्य पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे.



