चंद्रपूर : चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमी वर दरवर्षी साजरा होणाऱ्या धम्म चक्र अनुप्रवर्तन दिना निमित्त कलेक्टर हॉलिडे राहायचा. मात्र यावर्षी हि सुट्टी सोमवार पर्यंत घोषित न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे केंद्र व राज्य सरकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे तर इकडे मात्र काही अधिकारी हे विसरून जात आहेत. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रचंड नाराजी आणि रोष पाहायला मिळत आहे.
या देशात दोनच ऐतिहासिक धम्म दीक्षा सोहळे झाले. त्यापैकी एक म्हणजे चंद्रपूर येथील १६ ऑक्टोबरचा सोहळा होय. या ऐतिहासिक आणि प्रेरक स्मृतींची आठवण राहावी म्हणून काही वर्षांपासून चंद्रपूरातही नागपूर प्रमाणेच धम्म दीक्षा सोहळा साजरा केला जात आहे. या निमित्त मागील सहा वर्षांपासून जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर केली जात होती. मात्र यावर्षी सोहळ्याला दोनच दिवस शिल्लक असताना सुट्टीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रचंड रोष आणि नाराजी पाहायला मिळत आहे. मागील वर्षी सुद्धा असाच प्रयत्न झाला होता मात्र आंबेडकरी संघटनांनी दबाव आणताच ऐन वेळेवर हि सुट्टी जाहीर करण्यात आली होती.



